सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित मुद्यांशी संबंध नाही
![Not related to pending Supreme Court issues](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/bombay-high-court-1200-1-780x461.jpg)
शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका फेटाळताना न्यायालयाची टिप्पणी
मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी मागण्याचा आणि खरी शिवसेना कोणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुद्याचा काहीही संबंध नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी नमूद केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे दादर येथील आमदार सदा सरवणकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेल्या याचिकेविरोधातील हस्तक्षेप याचिका फेटाळली.
खरी शिवसेना कोणाची हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठीकडे प्रलंबित आहे. असे असताना ठाकरे गटाची शिवाजी पार्कवरील मेळाव्याची मागणी मान्य केल्यास त्यांना तीच खरी शिवसेना असा समज होईल, असा दावाही सरवणकर यांनी केला होता. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासमोरील प्रकरणांची माहिती ठाकरे गटाने लपवल्याचा दावा सरवणकर यांच्यावतीने वकील जनक द्वारकादास यांनी केला. तसेच खरी शिवसेना कोणाची हे निश्चित होईपर्यंत ठाकरे गटाच्या याचिकेला स्थगिती देण्याची मागणी केली होती.