मुंबईकरांसाठी गुड न्यूज ः नवरात्रोत्सव, महालक्ष्मी जत्रेसाठी बेस्टच्या २६ अतिरिक्त बसगाड्यांची सुविधा
![Good news for Mumbaikars: 26 additional BEST buses for Navratri festival, Mahalakshmi fair](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/best-bus-768x470.png)
मुंबई । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।
बेस्ट उपक्रमाने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी व त्यानंतर ख्रिस्ती बांधवांच्या वांद्रे येथील ‘माऊंट मेरी’ च्या जत्रेसाठी बस गाड्यांची विशेष व्यवस्था उपलब्ध केली होती. आता २६ सप्टेंबरपासून ‘नवरात्र उत्सव’ सुरू होत आहे. २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत ‘महालक्ष्मी’ची भरणार आहे. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी बेस्ट परिवहन विभागाकडून दररोज २६ अतिरिक्त बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. बेस्ट उपक्रम सध्या कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे. मात्र बेस्ट उपक्रम नागरिकांसाठी आजही विविध सेवासुविधा बहाल करीत असते. बेस्ट उपक्रमाचे परिवहन विभाग व वीज विभाग आपल्या ग्राहक, प्रवासी यांसाठी विविध सेवासुविधा पुरवते. बेस्ट उपक्रम हिंदू, ख्रिस्ती, मुस्लिम आदी धर्माच्या विविध सण, उत्सवांसाठी जादा बसगाडयांची सुविधा बहाल करते.
नुकताच दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव पार पडला. माऊंट मेरी यात्राही पार पडली. आता २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत महालक्ष्मी जत्रा भरणार आहे. या दिवसात मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी महालक्ष्मी मंदिरात येतात.
प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या २८, ३७, ८३, ५७, ए-७७, १५१, ए- १२४, ए ३५७ या बसमार्गावर दररोज २६ अतिरिक्त बसगाड्या चालविण्यात येणार आहेत.
या व्यतिरिक्त उपनगरीय प्रवाशांसाठी भायखळा तसेच महालक्ष्मी रेल्वे स्थानकाहून महालक्ष्मी मंदिरात जाण्याकरिता गर्दीच्या वेळी विशेष बससेवा नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत चालविण्यात येणार आहे. तसेच, जिजामाता उद्यान (भायखळा पूर्व) ते महालक्ष्मी मंदिर मार्गे भायखळा स्थानक (पूर्व) आणि महालक्ष्मी स्थानक अशा विशेष बसफेऱ्यांदेखील चालविण्यात येणार आहेत.