शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्यावर तब्बल एक हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप
![Shiv Sena MLA Aditya Thackeray and Congress MLA Aslam Sheikh have been accused of corruption worth Rs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Kirit-Somaiya1-1.jpg)
मुंबई | विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर भाजपाच्या नेतेमंडळींनी मुंबईत शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मढमधील स्टुडिओला भेट देऊन पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्यावर तब्बल एक हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. नियमात बसत नसताना देखील आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी मुंबईचे पालकमंत्री असताना या स्टुडिओच्या बांधकामाला परवानगी दिली आणि त्यातून स्टुडिओचं व्हॅल्युएशन असलेल्या एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.
“सीआरझेडमध्ये बांधकामाची परवानगी नसूनही…”
“आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या १ हजार कोटींच्या घोटाळ्याचं प्रात्याक्षिक आपण बघत आहोत. कोणत्याही पर्यावरण कायद्यात, सीआरझेड कायद्यात सीआरझेड एक, दोन विकास क्षेत्रात अशा बांधकामाची परवानगी देता येत नाही. जुलै २०२१ मध्ये आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी या जागेला भेट दिली होती. इथल्या २८ स्टुडिओंच्या बांधकामाचं मूल्यांकन एक हजार कोटी इतकं आहे. त्यावेळी परवानगी संपली होती. पण आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख या दोघा मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दादागिरी केली. भ्रष्टाचारी पद्धतीने जुलै २०२१मध्ये तात्पुरती परवानगी संपल्यानंतर देखील हे बांधकाम तोडलं नाही”, असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.
“आम्ही तेव्हा केंद्र सरकार आणि तत्कालीन महाराष्ट्र सरकारला सांगितलं की सीआरझेडमध्ये कोणतंही तात्पुरतं बांधकाम, चित्रीकरण सेट असं काहीच करता येत नाही. पण २२ फेब्रुवारी २०२१ ला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या आदेशामुळे त्यावेळच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी बेकायदेशीररीत्या सहा महिन्यांसाठी तात्पुरती परवानगी दिली होती. भाजपाच्या आमदारांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. आता याची चौकशी होणार”, असं किरीट सोमय्या म्हणाले.
“नोटीस देऊन महिना उलटला, तरी कारवाई नाही”
“या बांधकामाला बेकायदेशीर असल्याची नोटीस देऊन एक महिना झाला. पण अजूनही जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापालिकेचे अधिकारी करतायत काय? इथे बांधकाम तोडलं नाही तर दुसरा मजलाही बांधला. त्यामुळे मी महापालिका अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आणि पर्यावरण सचिवांना इशारा देतोय. महाविकास आघाडीच्या कामात त्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार केला असेल. पण आता ते दिवस संपले आहेत. ताबडतोब या स्टुडिओच्या मालकांवर गुन्हा नोंदवा आणि कारवाई करा”, असं सोमय्या म्हणाले.