एक कोटींचे इनाम असलेला जहाल नक्षलवादी पहाडसिंग पोलिसांना शरण
गेल्या १४ वर्षांपासून गडचिरोली आणि छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेला जहाल नक्षलवादी पहाड सिंगने अखेर आत्मसमर्पण केले आहे. छत्तीसगड पोलिसांना पहाडसिंग शरण गेला असून त्याच्यावर सुमारे १ कोटी रुपयांचे इनाम होते. पहाडसिंगने नक्षलवादी संघटनेत सामील झाल्यापासून अनेकांना ठार केले असून त्याच्यावर ६० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
जहाल नक्षली नेता पहाड सिंग याने गुरुवारी छत्तीसगडमधील दुर्ग पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पहाड सिंग शरण आल्याने नक्षलवादी संघटनेत खिंडार पाडण्यात पोलिसांना यश आले आहे. पहाडसिंग नक्षली गटाच्या महाराष्ट्र – मध्य प्रदेश – छत्तीसगड समितीतील सक्रीय सदस्य होता.
मूळचा राजनांदगाव जिल्ह्यातील फाफामार या गावचा असलेल्या पहाडसिंगची पत्नी शकुनीबाई गावची सरपंच होती. गावात विकास कामे करण्यावरून या पती पत्नीचा गावकऱ्यांशी वाद झाला. त्यातून शकुनीबाईवर अविश्वास आणण्यात आला. यामुळे अस्वस्थ झालेल्या पहाडसिंगने थेट बंदूक हाती धरली. नक्षलवादी कारवायांमध्ये त्याने अनेकांची हत्या केली. त्यांच्यावर ६० हून अधिक गुन्हे आहेत. पहाडसिंग पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार, अशी चर्चा २०१४ पासून सुरु होती.