नाशिक विमानतळाहून हैदराबादसाठी आज, शुक्रवार (दि. २२)पासून विमानसेवेचा प्रारंभ
![Flight service from Nashik airport to Hyderabad starts from today, Friday (Dec 22).](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Flight-service-from-Nashik-airport-to-Hyderabad-starts-from-today-Friday-Dec-22..jpg)
नाशिकः नाशिक विमानतळाहून हैदराबादसाठी आज, शुक्रवार (दि. २२)पासून विमानसेवेचा प्रारंभ होत असून, नाशिककरांना आता दररोज हवाईसेवा उपलब्ध होणार आहे. नाशिक-हैदराबाद विमानाला ‘स्पाइसजेट’ने तिरुपती व पुद्दुचेरी अशी कनेक्टिव्हिटी दिल्याने भाविक, पर्यटकांना या सेवेचा लाभ होणार आहे.
करोनामुळे खंड पडलेली विमानसेवा हळूहळू पूर्ववत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीची नवी दिल्ली, पुणे, बेंगळुरू, बेळगाव, तर स्टार एअरची केवळ बेळगावसाठी विमानसेवा सुरू आहे. पण, यापैकी अनेक विमाने आठवड्यातील सहा, तर काही विमाने एक वा दोन दिवसांसाठीच उपलब्ध होती. मात्र, आता ‘स्पाइसजेट’कडून आजपासून हैदराबादसाठी, तर ४ ऑगस्टपासून नवी दिल्लीसाठी दररोज विमानसेवा सुरू होत आहे. या सेवेसाठी प्रवासी नोंदणीला ६ जुलैपासून प्रारंभ झालेला आहे. नाशिक-हैदराबादसाठी ३,७०० रुपये प्रवासभाडे असून, या सेवेला तिरुपती व पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
…असे ठिकाण, अशी वेळ
नाशिकहून दररोज सकाळी ८.१० वाजता उड्डाण घेणारे विमान ९.४० वाजता हैदराबादला पोहोचेल. तेथून दुपारी १२.५५ वाजता तिरुपतीसाठी कनेक्टिंग फ्लाइट असून, ती दुपारी २.०५ वाजता तिरुपतीस पोहोचेल. दुपारी ११.५० वाजता पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग फ्लाइट असून, ती दुपारी १.३० वाजता तेथे पोहोचेल. तूर्त ही सेवा एकेरी असली, तरी लवकरच ती दुहेरी सुरू होण्याची शक्यता आहे. हैदराबाद येथून दररोज सकाळी ६.२० वाजता विमान निघणार असून, ते ७.५० वाजता नाशिकला पोहोचेल.
अनेक क्षेत्रांना फायदा
नाशिक-हैदराबाद विमानसेवेचा आयटी, उद्योगक्षेत्राला फायदा होणार आहे, तर तिरुपती व पुद्दुचेरी कनेक्टिव्हिटीचा भाविक, पर्यटकांना लाभ होणार आहे. नाशिक-हैदराबाद विमासेवेमुळे दक्षिण भारतातून शिर्डी, त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.