मुंबईसह राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ; आश्रम शाळेतील १५ विद्यार्थ्यांना एकाचवेळी लागण
पालघर: राज्यात करोना संसर्ग नियंत्रणात येत असला तरी आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबईजवळ असलेल्या पालघर येथील गिरगाव आश्रम शाळेतील १५ विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
पावसाचा जोर वाढल्यानंतर विविध आजारांनी डोके वर काढले आहे. गॅस्ट्रो आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मात्र, जुलै महिन्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत जुलैच्या पहिल्या १७ दिवसांत ११ स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, गिरगाव आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना लागण झाली आहे.
गिरगाव आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले व उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.
गिरगाव आश्रम शाळेतील मुलामुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थी आजारी असल्याने २२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ मुली आणि एक मुलगा अशा १५ विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे तपासणीअंती समोर आले. तर तीन विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि उर्वरित विद्यार्थी व्हायरल इन्फेक्शने आजारी असल्याचे समोर आले.
स्वाईन फ्ल्यू झालेल्या विद्यार्थ्यांची उपचारानंतर प्रकृती स्थिर असून खबरदारी म्हणून त्यांना वसतीगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. वसतीगृहात २२८ मुलं- मुली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून खबरदारी म्हणून वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.