नाशिकमधील एका मोठ्या घरफोडीची उकल करण्यात नाशिक पोलिसांना यश
![Nashik Police succeeded in solving a major burglary in Nashik](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Nashik-Police-succeeded-in-solving-a-major-burglary-in-Nashik.jpg)
नाशिक: नाशिकमधील एका मोठ्या घरफोडीची उकल करण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे. उपनगर परिसरात भरदिवसा झालेल्या या घरफोडीनं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करत, आर्थिक कमाई करताना झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी एका उच्चशिक्षिताने गुन्हेगारीचा ट्रॅक धरला. आपल्या दुसऱ्या मित्राला सोबत घेत त्यानं चक्क घरफोडी करण्याचा धक्कादायक ‘ट्रॅक’ धरल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे.
२१ लाखांचे दागिने आणि रोकड लंपास
नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने नाशिक रोडमधील दोघा संशयित तरुणांना बेड्या ठोकल्या. त्यांनी आठवडाभरापूर्वी जयभवानी रोडवरील एका बंगल्यात घरफोडी करत २१ लाख ६८ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे हिरेजडीत दागिने, रोकड लांबविली होती. ‘ईश्वर’ बंगला बंद असताना, चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला होता. तिजोरीतील सोन्या-चांदीचे हिरेजडीत दागिन्यांसह रोकड घेऊन चोरटे चारचाकी मोटारीतून फरार झाले होते. या प्रकरणी संजय ईश्वरलाल बोरा यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहितीच्या आधारे उलगडला मोठा गुन्हा
या गुन्ह्याचा समांतर तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांच्या नियंत्रणाखाली गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाकडून केला जात होता. हवालदार प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून वाघ यांनी त्वरित उपनिरीक्षक पोपट कारवाळ, शंकर काळे, गुलाब सोनार प्रकाश काळे, देवकिसन गायकर आदींच्या पथकाला सज्ज करत मोटवानी रोड गाठले. गोपनीय माहितीप्रमाणे, संशयास्पद रिट्स कार आली असता, पोलीस वाहन त्या कारपुढे आणून पथकाने कार रोखली. यावेळी कारमध्ये असलेल्या दोघांनी रोहन संजय भोळे, ऋषिकेश मधुकर काळे अशी ओळख सांगितली. दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पथकाने त्यांना संशयावरून ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
शेअरमार्केटमध्ये तोटा झाल्याने गुन्हेगारीकडे वळला
तसेच गेल्या मे महिन्यात जयभवानी रोड भागातही घरफोडी केल्याचे त्यांनी सांगितले. संशयित रोहन हा शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करत होता. त्यामध्ये त्याला तोटा झाला. त्यानंतर, तो सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी गुन्हेगारीकडे वळाल्याचे पोलिसांना कबुली दिलीय.