नाशिकमध्ये एका दिवसात रेकॉर्डब्रेक पाऊस; अकरा दिवसांत महिन्याभरातील दोन वर्षांतला आणि दिवसभरातील पाच वर्षांचा ‘रेकॉर्ड’
![Record-breaking rain in one day in Nashik; A 'record' of two years in a month in eleven days and five years in a day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Record-breaking-rain-in-one-day-in-Nashik-A-record-of-two-years-in-a-month-in-eleven-days-and-five-years-in-a-day.jpg)
नाशिकः जुलैच्या प्रारंभीच पावसाने संततधार सुरू ठेवल्याने अकरा दिवसांत महिन्याभरातील दोन वर्षांतला आणि दिवसभरातील पाच वर्षांचा ‘रेकॉर्ड’ मोडला आहे. आतापर्यंत अकरा दिवसांत शहरात ३८७. मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी २०१६ मध्ये जुलै महिन्यांत चोवीस तासांत १६०.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर, यंदा ३३ तासांत १२१.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
गेली पाच वर्षे दिवसभरात सत्तर मिमीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी झाली नव्हती. यामुळे २०२२ मध्ये दिवसभरात ७७.४ मिमीपेक्षा अधिक पावसाचा ‘रेकॉर्ड’ प्रादेशिक हवामान विभागाने नोंदविला. दरम्यान, रविवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह नाशिकमध्ये पावसाला सुरुवात झाली. रात्री साडेअकरा ते पहाटे अडीचपर्यंत १६.८ मिमी आणि पहाटे साडेपाचपर्यंत ५६.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
कमी दाबाचे क्षेत्र उशिराने निर्माण झाल्याने पावसाचा जोर जुलैत वाढला. गतवर्षी सातत्याने अवकाळीचे संकट ओढावले. त्याचाही हा परिणाम आहे. वाऱ्यांचा घटणारा वेग त्यामागील कारण आहे. सध्या अरबी समुद्रासह उत्तरेकडेही कमी दाबाचे क्षेत्र वाढल्याने सर्वत्र मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे काही वर्षांच्या तुलनेत यंदा जुलैत अधिक पर्जन्यवृष्टी होत आहे.
– सुनील काळभोर, प्रमुख, नाशिक हवामान केंद्र
दरम्यान, जिल्ह्यात १२ ते १४ जुलैदरम्यान अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जिल्हा प्रशासनाला हवामान विभागाकडून रेड अॅलर्ट देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सतर्कता म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) एक तुकडी नाशिकला रवाना केली आहे. पुढील सलग तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यंत्रणांनी सतर्कता बाळगत आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सोमवारी दिले.
रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० : ७७.४ मिमी
रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० : ४३.७ मिमी
वर्ष : जुलैतील पाऊस (मिमीमध्ये)
२०२१ : १३९.९
२०२० : ८२.९
२०१९ : ४९७
२०१८ : २८४
१९४१ : ५४९.५ (विक्रम)