मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईत तर वरूणराजा थांबण्याचं नाव घेत नाही, रेड, ऑरेंज अलर्ट काळात समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी
![Important news for Mumbaikars, in Mumbai, Varun Raja doesn't even mention stopping, ban on going to the beach during Red, Orange Alert](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Important-news-for-Mumbaikars-in-Mumbai-Varun-Raja-doesnt-even-mention-stopping-ban-on-going-to-the-beach-during-Red-Orange-Alert.png)
मुंबई : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत तर वरूणराजा थांबण्याचं नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी फक्त सकाळी ६ ते १० या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असणार आहे. त्यानंतर समुद्रकिनारी कुणीही फिरू नये, अशी सूचना महापालिका प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून तब्बल १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे.
वारंवार विनंती, आवाहनं करुनही मुंबईकर आणि इतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जातात, तसेच बीचवर पोहण्यास जातात, असं महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना कोणीही समुद्रकिनारी फिरण्यास किंवा पोहण्यास जायला प्रशासनाकडून बंदी करण्यात आली आहे. या संबंधित मुंबई महापालिका प्रशासनानं एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. मुंबईला पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मुंबईत ७ आणि ८ जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
काल (बुधवारी) झालेल्या मुसळधार पावसामुळं शहरातील काही भागांत पाणी साचल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ झाली. अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, धारावी, दादर, वडाळा, पनवेलमध्येही लोक साचलेल्या पाण्यातून वाट काढत घर गाठताना दिसले. पण संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळं साचलेलं पाणी ओसरलं. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात १५ एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.