धक्कादायक : मित्राला वाचवायला गेला आणि प्राण गमावले!
![Shocking: Went to save a friend and lost his life!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/मैत्रीचा-धक्कादायक-शेवट-मित्राला-वाचवायला-गेला-पण-दोघेही-परतले-नाहीत.jpg)
अमरावती : नांदगाव पेठ धरणावर मौजमजा करण्यासाठी आलेल्या युवकांसाठी रविवार हा घातवार ठरला. धरणात पोहण्यासाठी गेलेला युवक बुडत असल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या युवकाने धरणात उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी येथील वाळकी धरणात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विनय शिवदास चव्हाण, (वय २०), अभिषेक प्रदीप कुरळकर, (वय २१) असे घटनेत मृत्यमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. अमरावती आणि रहाटगाव येथील काही युवक धरणावर मौजमजा करण्यासाठी आलेले असतांना त्यातील अभिषेक प्रदीप कुरळकर रा. रहाटगाव हा पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला हे पाहून त्याठिकाणी असलेल्या विनय शिवदास चव्हाण रा. निशिगंधा कॉलोनी अमरावती याने क्षणाचाही विचार न करता अभिषेकला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण दोघांचाही पाण्यात बुडून करूण अंत झाला.
घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आपत्ती व्यवस्थापनाला पाचारण केले. आपत्ती व्यवस्थापन चमू देखील त्याठिकाणी दाखल झाली. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दोन्ही मृतदेह काढण्यात आपत्ती व्यवस्थापन चमूला यश मिळाले. दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय इथे पाठविण्यात आले. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण काळे यांचेसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर होते. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
वर्षभरातील ही दुसरी घटना असून आजवर चार युवकांनी याठिकाणी आपले प्राण गमावले आहे. विभागाने धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केलेली नसून दररोज याठिकाणी असंख्य तरुण तरुणी फिरायला येत असतात.