रिओ ऑलंपिकच्या अंतिम सामन्यातील पराभवाची परतफेड करण्यास सिंधू सज्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/pv-sindhu.jpeg)
रिओ ऑलंपिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना अनेक भारतीयांसाठी वेदनादायक ठरला. कारण प्रथमच कोणी भारतीय खेळाडू या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचली होती आणि सुवर्ण जिंकून इतिहास घडवण्याच्या वाटेवर होती. परंतु, स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिने भारताच्या पी.व्ही. सिंधूचा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. त्यामुळे अनेक भारतीय क्रीडाप्रेमींची मने दुखावली गेली.
रिओ ऑलंपिक मधील त्या पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी यावेळी पुन्हा पी. व्ही. सिंधुकडे चालून आली आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिची गाठ कॅरोलिना मरिनशीच आहे.
या दोन खेळाडूंमधील लढतीचा इतिहास मरिनच्या बाजूने आहे. या दोघींमध्ये झालेल्या ११ सामन्यात मरिनने ६ सामन्यात विजय मिळवला आहे तर सिंधूने ५ सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु या दोन खेळाडूमध्ये मलेशिया ओपन दरम्यान जूनमध्ये झालेल्या मागील सामन्यात सिंधूने विजय मिळवला होता.
मागीलवर्षी याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूला जपानच्या निजुमी ओकिहरा हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात विजय मिळवून जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी पहिला भारतीय खेळाडू होण्याची नामी संधी पीव्ही सिंधूला आहे. ALL THE BEST P.V. SINDHU!!!