#Covid-19: मुंबईत करोनासंबंधी दिलासादायक बातमी, रुग्ण वाढत असले तरी…
![Comfortable news about Corona in Mumbai, although the number of patients is increasing ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Comfortable-news-about-Corona-in-Mumbai-although-the-number-of-patients-is-increasing-....png)
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव होत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. अशात बुधवारी मुंबईत २,२९३ नवे करोना रुग्ण आढळले, तर एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला. बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जसजशी प्रकरणे वाढत आहेत, तसतशी आपण अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. मात्र, ही दिलासा देणारी बाब आहे की ९६ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी १,७६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईत अजूनही रिकव्हरी रेट ९७ टक्के आहे. मुंबईत मान्सून दाखल झाला, त्यामुळे नागरिकांनी मोसमी आजारांपासून सावध राहण्याची गरज आहे. बीएमसी आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी आढळलेल्या २,२९३ करोना रुग्णांपैकी फक्त ८४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी फक्त ११ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मुंबईतील पॉश भागात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळून येत असून, ही मुंबईकरांसाठी चिंतेची बाब आहे.
फक्त ५१६ रुग्ण रुग्णालयात दाखल
बीएमसी आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, रुग्णांची संख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांची संख्या तशी कमी आहे. मुंबईत करोना रुग्णांच्या उपचारासाठी २४ हजार ८६१ खाटा तयार ठेवण्यात आल्या असून त्यापैकी फक्त ५१६ खाटाच दाखल आहेत. मात्र, पॉझिटिव्हिटी दर हा चिंतेचा विषय आहे. अशात १७,१३९ लोकांची करोना चाचणी करण्यात आली.
रिकव्हरी दर अजूनही ९७ टक्के
मुंबईतील रिकव्हरी रेट अजूनही ९७ टक्के आहे, ही दिलासादायक बाब आहे. एकूण पॉझिटिव्हिटी दर ०.१५५ टक्के असला तरी तो सतत वाढत आहे. अशात रुग्ण दुप्पट होण्याचा दर ४३८ दिवसांवर आला आहे. BMC कडून करोनाला रोखण्यासाठी चाचणी, ट्रेसिंग, उपचारांसोबतच लसीकरणावर भर देण्यात येत आहे. इतकंच नाहीतर नागरिकांना बूस्टर डोस देण्याची मोहीमही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.