चोरी करताना अचानक घरामालक आला आणि बाहेरून लावली कडी; नंतर…
![While stealing, the landlord suddenly came and grabbed him; Then ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/While-stealing-the-landlord-suddenly-came-and-grabbed-him-Then-....jpg)
जळगाव : शहरातील निवृत्ती नगर परिसरात एका घरात चोरी करणाऱ्या चोरट्यांची चांगलीच फजिती झाली आहे. बंद घर फोडून चोरी करत असताना बाहेरगावी गेलेले घरमालक अचानक आले आणि त्यांनी बाहेरून दरवाजाची कडी लावली. भांबावलेल्या चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून पोबारा केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक अरविंद बसेर (वय-४१ रा. कार्तिक स्वामी मंदिर, निवृत्ती नगर, जळगाव) हे फार्मा कंपनीत नोकरीला आहे. रविवारी १२ जून रोजी दीपक बसेर यांच्या काकाचा वाढदिवस असल्याने सकाळी ६ वाजता घर बंद करून ते कुटुंबासह औरंगाबाद येथे गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून दीपक आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य सोमवारी १३ जून रोजी मध्यरात्री दीड वाजता निवृत्ती नगरातील घरी आले. त्यावेळी त्यांना घराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडलेले दिसून आले. तसंच घराचा मुख्य दरवाजाची कडीही तोडलेली आढळली.
‘पोलिसांना बोलावू नका…’
घरात चोरी होत असल्याचं लक्षात येताच दीपक बसेर यांनी लगेच बाहेरून कडी लावून घेतली. हा प्रकार लक्षात येताच चोरटे चांगलेच भांबावले. त्यानंतर मी पोलिसांना फोन करतो, असं दीपक यांनी सांगितल्यावर आतून चोरटे गयावया करू लागले आणि पोलिसांना बोलावू नका, अशी विनंती करू लागले. अखेर घाबरलेले चोरटे घराच्या मागच्या दरवाजा तोडून पसार झाले.
दरम्यान, शेजारी राहणाऱ्या वॉचमन छगन सबलाल पाटील यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु तिघे चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. चोरट्यांनी घरात सर्व सामान अस्ताव्यस्त करून लोखंडी कपाटातून १७ हजाराची रोकड लांबवली आहे. याप्रकरणी दीपक बसेर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी संतोष भंडारे करत आहे.