‘राजकारण माझा धंदा नाही’; राऊतांनी केलेल्या टीकेला अपक्ष आमदाराचं रोखठोक प्रत्युत्तर
!['Politics is not my business'; Independent MLA's strong response to Raut's criticism](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Politics-is-not-my-business-Independent-MLAs-strong-response-to-Rauts-criticism.jpg)
नांदेड : राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राज्यात मोठं नाट्य घडलं. सहावी जागा जिंकण्यासाठी लागणारी पुरेशी हक्काची मते नसतानाही भाजपने जुळवाजुळव करत सत्ताधारी महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का दिला. महाविकास आघाडीला समर्थन असलेल्या अपक्ष आणि इतर लहान पक्षांच्या आमदारांची मते फोडण्यात भाजपला यश आलं. त्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी थेट नावं घेत या आमदारांवर निशाणा साधला. राऊत यांनी केलेल्या या आरोपाचे लोहा कंधार मतदारसंघाचे शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी खंडन केलं असून मी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान केल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
‘मी राष्ट्रवादीचा सहयोगी आमदार असून महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनाच मी मते दिली,’ असं सांगताना श्यामसुंदर शिंदे यांनी संजय राऊत यांचा समाचारही घेतला आहे. आमदार शिंदे यांनी संजय राऊतांना महाभारतातील संजयची उपमा दिली. धृतराष्ट्रांना ज्याप्रमाणे संजय कुरुक्षेत्र लढाईची माहिती देत होते, त्याप्रमाणे संजय राऊतांना सर्व माहिती होत असेल, असा टोला शिंदे यांनी लगावला.
राजकारण माझा धंदा नाही. त्यामुळे टीकेने मला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रियाही आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर आमदार संजयमामा शिंदे आणि देवेंद्र भुयार यांनी देखील स्पष्टीकरण देत राऊत यांचे आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे भाजपला राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी लागणारी अतिरिक्त मते मिळवण्यासाठी नेमकी मदत केली तरी कोणी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.