महाराष्ट्रात चौथ्या लाटेची सुरुवात? ठाण्यात १९२ तर मुंबईत १३६% करोनाचे रुग्ण वाढले
![महाराष्ट्रात चौथ्या लाटेची सुरुवात? ठाण्यात १९२ तर मुंबईत १३६% करोनाचे रुग्ण वाढले](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/महाराष्ट्रात-चौथ्या-लाटेची-सुरुवात-ठाण्यात-१९२-तर-मुंबईत-१३६-करोनाचे.jpg)
मुंबईः महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतही करोनाने पुन्हा हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. मुंबई शहराच्या लगतच्या परिसरात करोनाचे आकडे वाढल्याचं चित्र आहे. एका आठवड्यात पालघरमध्ये ३५० टक्के आणि ठाण्यात १९२% करोना रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत १३६ टक्के वाढ झाली असून रायगड, पुणेसोबतच तिन जिल्ह्यात सामूहिक रित्या १३६ टक्के अधिक वाढ झाली आहे. महाराष्ट्रात करोनाची चौथी लाट असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Coronavirus in maharashtra)
गेले चार दिवस सतत करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मात्र, सोमवारी काही अंशी दिलासा मिळाला आहे. सोमवारी राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्यात काल १,०३६ आणि मुंबईत ६७६ नवीन रुग्ण सापडले आहेत. रविवारी चाचण्यांच्या संख्येत घट झाल्याने करोना रुग्णांच्या संख्येतही घट दिसून आली. रुग्णवाढीनंतर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७,४२९ इतकी आहे तर, एकट्या मुंबईत ५, २३८ रुग्ण आहेत. शहराचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ८.८२ टक्के आहे.
सहा जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी – ४.७१ टक्के, मुंबई – ८.८२, पालघर – ४.९२ टक्के असा आहे. ठाणे शहराने सोमवारी २० टक्के दैनिक पॉझिटिव्हिटी रेटची नोंद केली आहे. हा दर रविवारच्या तुलनेत जवळपास १० टक्के अधिक आहे.
मुंबईच्या रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी ५४ रुग्णांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेय त्यामुळं रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या २१९ इतकी झाली आहे. तर, राज्यात एकूण २५४ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांबाबत बोलायचं झाल्यास फक्त १.०४ (६१) रुग्ण गंभीर आहेत. तर, संपूर्ण राज्यात फक्त तीन रुग्ण व्हेटिंलेटरवर आहेत. तर बाकी ९६ टक्के रुग्णांना लक्षणविहरीत आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
२५,००० चाचण्यांचा दावा
मुंबईतील साप्ताहिक पॉझिटिव्ही रेट पाहता प्रशासनाने चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात २५, ००० चाचण्या करण्यात येत आहे. ताप, सर्दी आणि व्हायरल सारखे लक्षण दिसल्यास त्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आदेश अधिकाऱ्यांनी दिली आहेत.