breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

उद्या मी अर्ज भरणार, त्याआधी पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली : संजय राऊत

मुंबई : शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत उद्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्याबरोबर कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार देखील अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली. उद्या अर्ज भरणार असल्याने पवारसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचं राऊत यांनी सांगितलं. तसेच सेनेच्या दोन्ही उमेदवारांमागे महाविकास आघाडी भक्कमपणे असल्याने दोन्ही उमेदवार गुलाल उधळतील, अशी ग्वाहीही पवारांनी दिल्याचं राऊत यांनी सांगितलं. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्या मी अर्ज भरणार आहे. त्याआधी पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. राज्यसभेच्या अनुशंगाने पवार यांच्याशी चर्चा झाली. शिवसेनेचा सहावा उमेदवार विजयी होईल यावर शरद पवार ठाम आहेत, असं राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेचे दोन उमेदवार उद्या राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत. उद्या मी अर्ज भरत असल्याने शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. शरद पवार हे राज्याचे तसेच देशाचे एक उत्तुंग नेतृत्व आहे. या सरकारचा ते आधारस्तंभ आहेत. वडीलधारे आहेत. त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यानिमित्ताने अनेक विषयांवर चर्चा झाली. बऱ्याच वेळ आम्ही विविध विषयांवर चर्चा केली.” “शिवसेनेचा सहावा उमेदवार विजयी होईल यावर शरद पवार ठाम आहेत. त्याबाबतची सगळी तयारी होतीये. पण भाजपने जरी राज्यसभा बिनविरोध न करता निवडणुकीची तयारी केली तर आमचीही तयारी आहे. घोडेबजार होऊ नये, भाजपने घोडेबजाराला उत्तेजन देऊ नये, या मताचे आम्ही सगळे आहोत. पण जर घोडेबाजार करत असेल तर ती त्यांची इच्छा. कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका ठरली आहे. महाविकास आघाडीतील सगळे पक्ष आणि अपक्ष सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या पाठीशी आहेत”, असं राऊत यांनी सांगितलं.

छत्रपती संभाजीराजे यांना सेनेने डावलल्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सेनेने राजेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका ते करत आहेत. यावर राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. आमच्या वाटणीची जागा आम्ही छत्रपतींना द्यायला तयार झालो. याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात का? कुणी काहीही बोलत असेल तर जरा जपून बोला”, असा इशाराच राऊत यांनी दिला. तर महाविकास आघाडीवर असे चुकीचे आरोप करणं हा छत्रपतींच्या विचारांचा अपमान आहे, असंही राऊत म्हणाले. “आम्ही स्वत: शिवसेनेची एक जागा जी जागा जिंकण्यासाठी ४२ मतं लागतात, त्या जागेवर उमेदवार म्हणून छत्रपतींना संधी द्यायला तयार होतो. छत्रपतींनी ती संधी घ्यायला हवी होती. संभाजीराजेंनी याआधी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांनाही राजकीय पक्षांची मजबुरी काय असते ते माहिती आहे. त्यामुळे आम्ही खंजीर खुपसला अशी भाषा कुणी करु नये”, असं संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button