नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, ते फक्त हेडलाईन मिळवण्यापुरतं – उपमुख्यमंत्री अजित पवार
![नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, ते फक्त हेडलाईन मिळवण्यापुरतं - अजित पवार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/नाना-पटोलेंचं-वक्तव्य-हास्यास्पद-ते-फक्त-हेडलाईन-मिळवण्यापुरतं-अजित.jpg)
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिउत्तर देत नाना पटोलेंचं ते वक्तव्य हे हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. तसेच, ते काँग्रेसमध्ये भाजपमधून आले, मग भाजपने म्हणायचं का की त्यांनी पाठीत खंजीर खुपसलं, असा टोलाही त्यांनी लगावला. “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक निवेदन केलं, की आम्हाला खंजीर खुपसण्याचं काम झालं मला नाना पटोलेंचं ते वक्तव्य हास्यास्पद वाटतं. कारण, नानाच कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले हे तुम्हाला माहितीये. ते भाजपमध्ये होते. तेवढ्यावेळपुरतं हेडलाईन मिळवण्यासाठी हे वाक्य त्यांना बरोबर वाटत असेल. पण, संघटनेत प्रत्येक पक्ष आपआपल्या परिने काम करत असतं”, असं म्हणत त्यांनी पटोलेंना टोला लगावला आहे.
“आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस काम करतंय. राज्य आणि देशस्तरावर निर्णय घेत असताना राष्ट्रीय पातळीवरचे नेते निर्णय घेतात. जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात. तिथली राजकीय, भौगोलिक परिस्थिती, तिथलं वातावरण, सर्वामध्ये राहाण्याकरता सर्वच राजकीय पक्षांमध्ये समन्वय असला तर हे प्रश्न निर्माण होत नाही. काँग्रेसनेही काही तालुक्यांमध्ये भाजपबरोबर संधान बांधलं. मी त्याला फार महत्त्व देऊ इच्छित नाही. जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करताना आपल्या वक्तव्याचा कुठे काही वेडावाकडा अर्थ निघून वेडावाकडा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्वांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे”,असं म्हणत त्यांनी नाना पटोलेंना सुनावलं.