जळगावात नाष्टा सेंटरमधील सिलेंडरने अचानक घेतला पेट, दोन जण जखमी
![The cylinder in the breakfast center in Jalgaon suddenly took a beating, injuring two people](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/The-cylinder-in-the.png)
जळगाव | जळगाव शहरातील भूषण कॉलनी येथे नास्ता सेंटरच्या दुकानातील गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने दुकानाला आग लागली. ही घटना गुरुवारी(काल) घडली. या घटनेत २ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने सिलेंडरचा स्फोट झाला नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या जवळ पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे येथे प्रकाश भोळे यांचे सावकारे नाष्टा सेंटर नावाचे दुकान आहे. गुरूवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानातील गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरमधून अचानक गॅस गळती झाल्याने आग लागली. अचानक आग लागल्याने गल्लीतील नागरिकांनी धाव घेवून मिळेल तसा पाण्याचा मारा करण्यास सुरूवात केली. ही आग विझविण्याच्या प्रयत्नात दुकान मालक ज्योती विजय सावकारे व विजय सावकारे हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
आगीत दुकानातील सुमारे १ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. काही मिनिटातचं रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी काही वेळाच आग आटोक्यात आणली व सिलेंडर बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाचे वाहन चालक देविदास सुरवाडे, भगवान जाधव,वसंत कोळी यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे.