विनयभंगाच्या गुन्ह्यातही बोठेला दिलासा नाही, हायकोर्टाने दिला ‘हा’ निर्णय
![Bothe is not relieved even in the case of molestation, the High Court ruled 'yes'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Bothe-is-not-relieved-even-in-the-case-of-molestation-the-High-Court-ruled-yes.jpg)
अहमदनगर| रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठेपाटील याला विनयभंगाच्या गुन्ह्यातही दिलासा मिळाला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला. मूळ खुनाच्या गुन्ह्यातही त्याचा जामीन अर्ज यापूर्वीच फेटळण्यात आला आहे.
रेखा जरे यांच्या खुनाची घटना घडल्यानंतर अहमदनगर शहरातील एका विवाहित महिलेने बोठे विरूद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती. आपल्या सासू सोबत असलेल्या परिचयामुळे आरोपीचे आमच्या घरी येणे जाणे होते. त्यावेळी घरी आल्यावर सासूची नजर चुकवून आरोपी त्रास देत होता. इतरवेळीही सतत फोन करून त्रास देत असे, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात २७ डिसेंबर २०२० रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी बोठे याने प्रथम जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. तेथे न्यायालयाने तो फेटाळला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी बाजू मांडली. मूळ फिर्यादीतर्फे वकील सचिन पटेकर यांनी काम पाहिले.
सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात बोठे याने उच्च न्यायालयात आपील केले होते. त्यावर न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपीविरूदध सबळ पुरावे आहेत, त्याचे फिर्यादी महिलेसोबत वारंवार बोलणे झाल्याचे पुरावे आहेत. असा युक्तिवाद करून सरकारतर्फे यासंबंधीचे पुरावेही न्यायालयात सादर करण्यात आले. मूळ फियार्दीतर्फे ड. नारायण नरवडे यांनी काम पाहिले.
मूळ खुनाच्या गुन्ह्यानंतर आता विनयभंगाच्या गुन्ह्यातही आरोपीचा जामीन फेटाळला गेला आहे. या दोन्ही खटल्यांची नियमित सुनावणी सत्र न्यायालयात अद्याप सुरू झालेली नाही.