मिलिंदनगर येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/crime-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
मिलिंदनगर पिंपरी येथे चार जणांनी जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर कोयता आणि चॉपरसारख्या हत्यारांनी वार करून खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री साडेनऊ वाजता घडली.
राहुल बाबुराव टोणपे (वय 26, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तन्वीर युसुफ शेख – घोडेवाला (वय 28, रा. काळेवाडी), अतुल पवार (वय 28, रा. पिंपरी), विशाल पवार (वय 31, रा. पिंपरी), अक्षय येवले (वय 21) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता मिलिंदनगर मधील एफ बिल्डींगच्या पार्किंग मध्ये थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. ‘काही दिवसांपूर्वी झालेली भांडणे सर्वांना सांगतोस काय’ असे म्हणून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून धमकावले. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता आणि चॉपरसारख्या हत्यार व बांबूने फिर्यादीस मारून गंभीर जखमी केले. मोठमोठ्याने शिवीगाळ करत कोयता हवेत फिरवून ‘जर कोणी सोडविण्यास मध्ये आला तर त्याला सुद्धा खल्लास करतो’ अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली.
पोलिसांनी आरोपी विशाल पवार आणि अक्षय येवले या दोघांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.