निगडी येथे हॉकी स्टिकने मारहाण करत घातला दरोडा : सहा जणांवर गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/arrest01.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
निगडी मधील सिद्धिविनायक कॉलनी येथे सहा जणांनी मिळून तिघांना हॉकी स्टिक, हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लुटले. याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 एप्रिल रोजी मध्यरात्री सव्वादोन ते तीन वाजताच्या कालावधीत घडली.
स्वप्नील हनुमंत माने (वय 31, रा. निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकीवरून आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना अडवून हाताने, लाथाबुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने मारहाण केली. फिर्यादी यांची 50 हजारांची दुचाकी, पाच हजारांचा मोबाईल फोन, 300 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली.
त्यानंतर गणेश महादेव गोरे याला मारहाण करून 1400 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. सत्यं अंबुजकुमार लाल यांना लोखंडी कोयत्याच्या उलट्या बाजूने मारून जखमी केले. त्यांच्याकडील एक हजार रुपये रोख रक्कम आणि पाच हजारांचा मोबाईल फोन काढून घेतला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.