राज्य चालवताय का हजामत करताय; राजू शेट्टी यांचा सरकारवर घणाघात
![Shaves the state; Raju Shetty's attack on the government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Shaves-the-state-Raju-Shettys-attack-on-the-government.jpg)
सांगली| राज्य चालवताय, का हजामत करताय ? अशा संतप्त शब्दात स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा व २४ तास वीज मिळावी, यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. त्याबाबत १ मे रोजी गावागावात होणाऱ्या ग्रामसभेत शेतकर्यांना २४ तास वीज मिळण्याबाबतचा ठरावही घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीच्या भिलवडी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकासआघाडीतून बाहेर पडले आहेत.आता राज्य सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनात उतरण्याची तयारी राजू शेट्टी यांनी सुरू केली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा आणि २४ तास वीज मिळावी या मागणीसाठी आपण आग्रही असल्याचे राजू शेट्टी यांनी भिलवडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, राज्यात दुधाचे एक रकमी पैसे मिळतात,कापसाचे पैसे एक रकमी मिळतात, मग उसाचे पैसे एकरकमी का मिळत नाहीत? म्हणून आम्ही एकरकमी एफआरपीवर ठाम आहोत. राज्यात उन्हाळी सोयाबीन पिकाच्या बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा समोर आले आहे. हे राज्य सरकार आणि कृषी विभागाचे अपयश आहे. शेतकऱ्यांना महाबीजकडून बियाणे देण्यात आले. महाबीजवर नियंत्रण हे कृषी मंत्रालयाचे असते आणि कृषी मंत्रालय हे राज्य सरकार चालवते. सोयाबीन बियाणांमध्ये फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी राज्यातून पुढे येत आहेत. मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक झालेली आहे. आज एका बाजूला ही फसवणूक आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. रात्रीच्या वेळेस साप चावून अनेक शेतकरी मृत पावलेले आहेत. त्यामुळे चेष्टा चालवली आहे का? तुम्ही राज्य चालवता की, हजामत करता? अशा शब्दात शेट्टी यांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे.
राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळालीच पाहिजे. एका बाजूला सर्वसामान्यांना २४ तास वीज,मात्र शेतकऱ्यांना रात्री, हा अन्याय आहे. राज्यातून ज्या धरणातून वीज निर्मिती केली जाते, त्या धरणातील जमिनी या शेतकऱ्यांचे आहेत. मात्र त्याच शेतकऱ्यांना आज वीज मिळत नाही. संविधानानुसार ऊर्जा संपत्तीवर सर्वांचा सामना हक्क आहे.पण इतरांना दिवसा वीज व शेतकरयांना रात्रीचे वीज हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आणि २४ तास वीज मिळावी यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून यासाठी येत्या १ मे रोजी होणाऱ्या गावागावातील ग्रामसभेमध्ये दिवसा आणि २४ तास वीज मिळणे बाबतचा ठराव देखील होणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.