पुणे लीग कबड्डी स्पर्धा: बारामती, हवेली, जुन्नर, खेड यांची आगेकूच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/pune-kabaddi-lig.jpg)
पुणे: पुरुष विभागात बलाढ्य बारामती, सिंहगड हवेली, शिवनेरी जुन्नर, झुंजार खेड या संघांनी, तर महिला विभागात झुंजार खेड संघाने साखळी सामन्यात विजय मिळताना पुणे लीग कबड्डी स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी पाषाण यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे.
बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील पुरुष विभागात बलाढ्य बारामती संघाने माय मुळशी संघावर 35-30 अशी मात केली. मध्यंतराला बलाढ्य बारामती संघाकडे 23- 9 अशी आघाडी होती. बलाढ्य बारामतीच्या प्रणव नखातेने 12 गुण, तर नीलेश काळबेरेने 11 गुण मिळविले. मुळशी संघाच्या बबलू गिरीने 9 गुण, तर ऋषिकेश बानकरने 8 गुण मिळविले.
पुरुषांच्या दुसऱ्या सामन्यात सिंहगड हवेली संघाने लयभारी पिंपरी चिंचवड संघाचा 29-19 असा पराभव केला. हवेली संघाच्या निखिल भस्मारे याने 3, ऋषिकेश नखाते याने 11 गुण व पवन गर्जे याने 4 गुण मिळविले. पुरूषांच्या तिसऱ्या सामन्यात शिवनेरी जुन्नर संघाने छावा पुरंदर संघावर 43-35 असा विजय मिळविला. अक्षय जाधवने 15 गुण, तर प्रथमेश निघोटने 6 गुण मिळविले.
चौथ्या सामन्यात झुंजार खेड संघाने वेगवान पुणे संघावर 21-17 असा विजय मिळविला. खेडच्या आदिनाथ घुलेने 7 गुण मिळविले. पुण्याच्या चेतन पारधेने 6, पवन करडेने 4 आणि गणेश कांबळे याने 3 गुण मिळविले. पाचव्या सामन्यात बलाढ्य बारामती संघाने सिंहगड हवेली संघाचा 32-19 असा पराभव केला. पुरूषांच्या सहाव्या सामन्यात शिवनेरी जुन्नर संघाने झुंजार खेड संघाचा 46-20 असा पराभव केला. शिवनेरी जुन्नर संघाच्या अक्षय जाधवने 17 गुण मिळविताना विजयात मोलाचा वाटा उचलला.
महिलांच्या गटांत छावा पुरंदर संघ व वेगवान पुणे संघ यांच्यात झालेला सामना 18-18 अशा समान गुणांवर संपला. पुरंदरच्या मानसी रोडे हिने 7 गुण, तर कोमल गुजर हिने 4 गुण मिळविले. पुणे संघाच्या धनश्री सणसने 7, श्रध्दा चव्हाणने 5 गुण, तर दीक्षा जोरीने 4 गुण मिळविले. महिलांच्या दुसऱ्या सामन्यात झुंजार खेड संघाने माय मुळशी संघाचा 26-22 असा पराभव केला. झुंजार खेडच्या सत्यवा हळदकेरीने 7 गुण, तर मृणाल चव्हाणने 5 गुण मिळविले. त्यांना ऋतिका होनमाने हिने चांगली साथ देत. 5 गुणांची कमाई केली. माय मुळशीच्या हर्षदा सोनावणे हिने 6, तेजल पाटील हिने 5, तर दिव्या दरेकर व रूचिरा गुळवे यांनी प्रत्येकी 3 गुण मिळविले.