अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुनील शेळकेंची कामगिरी; मावळासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी
![Sunil Shelke's performance in the budget session; Billions of rupees funded for Mawla](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Vadgaon-Maval-News-मावळ-तालुक्याच्या-सर्वांगीण-विकासासाठी-अर्थसंकल्पीय-अधिवेशनात.jpg)
मावळ : आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून अर्थसंकल्पीय अधिवेशनात 95 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मावळ तालुक्यासाठी मंजूर झाला आहे. पुढे आपण सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी मावळ तालुक्याच्या विकासासाठी आणला आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रश्नांची लक्षवेधी विधानसभेत मांडली, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
पवना प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, लोणावळा येथील भुयारी गटर योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, वनविभागाच्या हद्दीतील रस्ते व मूलभूत सुविधांसाठी परवानगी द्यावी, मावळात पर्यटनवाढीच्या दृष्टीने चालना मिळावी, तक्रारप्राप्त रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करून बचत गटांना देणे, आरोग्य उपकेंद्रांचे प्रस्ताव व लोणावळा, कान्हे येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी निधी मिळावा आदीबाबत आमदार सुनील शेळके यांनी लक्षवेधी मांडली.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मावळातील विविध विकासकामांसाठी सुमारे ९५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. येत्या दोन महिन्यांत ६० ते ६५ कोटी निधी मिळणे अपेक्षित असून जुलै अखेर पर्यंत तर शासनाकडे १७५ कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत १ हजार कोटींपर्यंत मजल मारू असा ठाम विश्वास आमदार सुनील शेळके यांनी सोमवार (दि 28) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह येथील आयोजित पत्रकार परिषदेस मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश खांडगे,युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कारके, युवक तालुकाध्यक्ष किशोर सातकर, वडगाव नगरपंचायतचे नगरसेवक व सह्याद्री फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील ढोरे, उद्योजक संदीप गराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार शेळके म्हणाले की, २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मावळ तालुक्यातील बिगर अदिवासी सर्वसाधारण रस्त्यांसाठी ३७ कोटी ५ लक्ष रुपये, आदिवासी रस्त्यांसाठी ६ कोटी रुपये, विशेष रस्ते दुरुस्तीसाठी ११ कोटी रुपये, नाबार्ड अंतर्गत रस्ते सुधारणेसाठी ५ कोटी रुपये, पानंद रस्ते सुधारणा करण्यासाठी १३ कोटी २० लाख रुपये, सामाजिक न्याय अंतर्गत दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी १ कोटी रुपये, मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ६० लाख रुपये,ग्रामविकास निधी अंतर्गत गावांतील विविध विकास कामांसाठी १० कोटी रुपये, ग्रामीण मार्ग सुधारणेसाठी २ कोटी रुपये तसेच सुदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ सुधारणा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला
वडगाव मावळ नगरपंचायत येथे पाणी पुरवठा योजनेसाठी ३३ कोटी ८३ लक्ष रुपये, आढले,डोणे, ओव्हळे व इतर गावांसाठी पवना उपसा सिंचन योजना राबविण्याकरीता ६० कोटी ५० लक्ष रुपये, ऐतिहासिक तळ्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासाठी २७ कोटी १५ लक्ष रुपये, तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद व वडगाव आणि देहू नगरपंचायत हद्दीतील विद्युत वाहक तारा भूमिगत करण्याच्या कामासाठी ४१ कोटी ९० लक्ष रुपये, मावळ तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामध्ये मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत विकासकामांसाठी ८ कोटी २० लक्ष रुपये, पर्यटन विकास अंतर्गत कामांसाठी ७ कोटी ९० लक्ष रुपये, मावळ तालुक्यातील १७ गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे यासाठी ३ कोटी ९७ लक्ष रुपये, वडगाव आणि देहू नगरपंचायत येथे अग्निशमन यंत्रणा उभारणेसाठी २ कोटी २० लक्ष रुपये अशा एकूण १८५ कोटी ६५ लक्ष रुपयांची कामे मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.