पिंपरी- चिंचवड शहरातील पाणीप्रश्नी लक्ष घालणार: वरुण सरदेसाई
![Pimpri-Chinchwad water issue to be addressed: Varun Sardesai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Pimpri-News-शहरातील-पाणीप्रश्नी-लक्ष-घालणार-वरुण-सरदेसाई.jpg)
पिंपरी :ऐन उन्हाळ्यात दापोडी फुगेवाडीसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील करदात्या नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यात आपण लक्ष घालावे अशी मागणी पिंपरी युवासेनेने युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्याकडे केली. त्यावर शहरातील पाणीप्रश्नी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सरदेसाई यांनी दिले.
पुणे दौ-यावर असलेले युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांची पिंपरी विधानसभा युवा अधिकारी निलेश हाके यांनी भेट घेतली. ऐन उन्हाळ्यात दापोडी फुगेवाडीसह संपूर्ण पिंपरी -चिंचवड शहरातील करदात्या नागरिकांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. प्रशासनाकडून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असूनही योग्य व मुबलक पाणीपुरवठा नागरिकांना होत नाही. प्रशासनाकडून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्नावर कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही. अधिकाऱ्यांना जाब विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. याबाबत आपन गांभीर्याने लक्ष देत पाण्याच्या गंभीर समस्येतून नागरिकांची मुक्तता करावी असे निवेदन सरदेसाई यांना दिले.