मुंबईत आमदारांना कायमस्वरूपी घरे ; बीडीडी चाळीला ठाकरे, पवार, राजीव गांधी यांचे नाव
![Permanent housing for MLAs in Mumbai; Names of BDD Chalila Thackeray, Pawar, Rajiv Gandhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/mv3-bdd.jpg)
मुंबई | मुंबईत आमदारांसाठी कायमस्वरूपी घरे देण्यात येतील, अशी घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच वरळीतील बीडीडी चाळीचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मुंबईत स्वस्तात कायमस्वरूपी घर मिळावे अशी सर्वपक्षीय आमदारांची मागणी होती. गेल्याच आठवडय़ात आमदार निधीत एक कोटी वाढ करून तो पाच कोटी रुपये करण्यात आल्यावर, आमदारांना आता कायमस्वरूपी घरे देण्याची घोषणा झाल्याने आमदारमंडळी खूश झाली आहे.
मुंबईतील ५० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचा पुनर्विकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, म्हाडाच्या जागेवरील अतिक्रमण, धारावी व बीडीडी चाळींचा पुनर्विकास आदी विषयांवरील चर्चेला उत्तर देताना आव्हाड यांनी, मुंबईतील म्हाडाच्या जागा हडप करणाऱ्या बिल्डरांविरोधात महाविकास आघाडी सरकार कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच केले. यासाठी जॉनी जोसेफ यांची समिती गठित केली आहे. बिल्डरांनी घशात घातलेला म्हाडाचा भूखंड ताब्यात घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.
कामाठीपुरामध्ये ९४३ उपकरप्राप्त इमारती असून ८३४४ भाडेकरू आहेत. या इमारती खूप जुन्या झाल्याने बीडीडी चाळींप्रमाणेच आता या परिसराचा पुनर्विकास करण्याचे ठरवले असून म्हाडा हे नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार आहे. तीन महिन्यांत कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू होईल, असे आव्हाड यांनी जाहीर केले.
मुंबईतील जिजामातानगर येथे विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी एक नवे वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतलेला आहे. तर ताडदेव येथे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ३२ कोटी खर्च करून ९२८ महिला राहू शकतील असे वसतिगृह बांधण्यात येत आहे. तसेच पालघर येथे २० एकरची जागा मिळाल्यास तिथे एक चांगला वृद्धाश्रम बांधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मुंबईत एकूण ६०० एसआरए प्रकल्प रखडले आहेत. ज्या बिल्डरांनी एसआरएच्या जागेवर विक्रीसाठीची इमारत बांधून पळ काढलेला आहे आणि झोपडीधारकांना संक्रमण शिबिरात ठेवलेल्या बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्याची भूमिकाही आव्हाड यांनी मांडली.