शिक्षकच गेल्या दोन वर्षांपासून करत होता शारीरिक छळ, व्हिडीओ दाखवत अश्लील चाळे; अंबरनाथमधील धक्कादायक घटनेने खळबळ
![The teacher had been physically abusing her for the past two years, showing pornographic videos; Excitement over the shocking incident in Ambernath](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Ambarnath-Teacher-Arrested.jpg)
मुंबई |
अंबरनाथ शहरात खासगी शिकवणीत एक शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दररोजच्या त्रासाला कंटाळून अखेर विद्यार्थिनीने पालकांना ही बाब सांगितली. पालकांनी केलेल्या तक्रारीवरून अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी राहुल यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या स्वानंद इमारतीत एक खासगी शिकवणी आहे. या शिकवणीत शिकवणारा शिक्षक राहुल यादव हा ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिकवणी संपल्यानंतर देखील जबरदस्तीने थांबवून बोलण्याच्या बहाण्याने तिला स्पर्श करायचा. मोबाइलमधील अश्लील चित्रफिती दाखवायचा. तसंच तिला व्हिडीओत दाखवल्यानुसार आपल्याला तसे करायचे आहे असे सांगायचा.
विद्यार्थिनीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याआधी देखील तुला स्पर्श करतानाचे व्हिडीओ माझ्या मोबाइलमध्ये आहेत. त्यामुळे याबाबत कोणाला सांगितले तर तुला ठार मारण्याची धमकी देत असायचा. तसंच माझ्याकडील व्हिडीओ तुझ्या घरच्यांना पाठवेन असं सांगून धमकावयचा. अखेर गेल्या दोन वर्षांपासून होणाऱ्या या मानसिक आणि शारिरीक छळाला कंटाळून पीडित विद्यार्थिनीने घरच्यांना याची माहिती दिली. त्यानंतर अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी नगर पोलिसांनी राहुल यादव या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.