बीड नगरपालिकेत विकासकामांमध्ये अनागोंदी; आमदाराच्या तक्रारीनंतर मंत्र्यांनी मुख्याधिकार्यासह सहा अधिकाऱ्यांना केलं निलंबित
![बीड नगरपालिकेत विकासकामांमध्ये अनागोंदी; आमदाराच्या तक्रारीनंतर मंत्र्यांनी मुख्याधिकार्यासह सहा अधिकाऱ्यांना केलं निलंबित](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/vinayak-mete-1.jpg)
बीड |
बीड नगरपालिकेच्या अमृत अटल योजनेसह भुयारी गटार, रमाई आवास योजना व अन्य कामात मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू असल्याची लक्षवेधी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सोमवारी सभागृहात मांडली. या लक्षवेधीवर झालेल्या चर्चेनंतर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कृर्ष गुट्टे यांच्यासह प्रशासन अधिकारी नीता अंधारे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राहुल टाकळे, बांधकाम अभियंता योगेश हाडे, कर अधीक्षक सुधीर जाधव आणि कनिष्ठ रचना सहाय्यक सय्यद सलीम याकूब या सहा जणांच्या निलंबनाची घोषणा केली. नगरपालिके अंतर्गत सुरू असलेल्या अमृत अटल, भुयारी गटार योजनेसह अन्य कामाची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिका अंतर्गत विविध योजनेतून सुरू असलेल्या आणि झालेल्या कामाच्या चौकशीचे आदेशही यावेळी देण्यात आले.
बीड पालिकेतील गैरकारभारप्रश्नी आमदार विनायक मेटे यांनी दाखल केलेल्या लक्षवेधीवर सभागृहात चर्चा झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार समीश चव्हाण, संजय दौंड यांनी या चर्चेत सहभागी होत नगरपालिकेच्या संबंधित अधिकार्यांना तात्काळ निलंबित करुन गैरकारभाराची चौकशी करावी, अशी मागणी केली. माजलगाव बॅक वॉटर आणि बिंदुसरा प्रकल्पातून शहराला दुषित पाणी पुरवठा होतो. दोन्ही प्रकल्प तुडूंब असतानाही पंधरा दिवसाला पाणी पुरवठा करुन नागरिकांना वेठीस धरले जात आहे. अनेक वसाहतींमध्ये वीज पुरवठा होत नाही. पथदिवे बंद आहेत. करोना काळात मृतांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या निधीतही भ्रष्टाचार झालेला आहे. अनधिकृत बांधकामे, रस्त्याची अपूर्ण कामे, अमृत अटल योजनेसह भुयारी गटार योजनेच्या कामाचे मुद्दे आमदार मेटे यांनी सभागृहात उपस्थित केले. नगरपालिका अंतर्गत एकही काम निविदेप्रमाणे होत नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. जिल्हाधिकार्यांनी सक्त ताकीद देऊनही मुख्याधिकार्यांनी त्यांच्या वर्तनात बदल केला नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीलाही मुख्याधिकारी गैरहजर होते, आदि मुद्दे आमदार मेटे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.