मुख्यमंत्री- शरद पवार बैठक
![CM-Sharad Pawar meeting](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Sharad-Pawar-Uddhav-Thackeray-1.jpg)
मुंबई | उत्तर प्रदेशसह चार राज्यांत विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला विजय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना दिलेला सूचक इशारा या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास एक तास बैठक झाली. चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी वर्षां या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास एक तासभर चर्चा झाली. राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री व नेत्यांवर गेल्या काही दिवसांत ईडीनंतर आता प्राप्तीकर विभागाचे छापे पडू लागले आहेत. आता उत्तर प्रदेशसह चार राज्यांत सत्ता आल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. तशात भाजपच्या विजयोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय यंत्रणांवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा वापर वाढण्याची व राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरे यांच्यात भेट झाल्याने विधानसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय परिस्थिती व महाविकास आघाडी सरकारची पुढील भूमिका आदी विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.