मध्य रेल्वेवर उद्या ८ तासांचा मेगाब्लॉक, दिवा ते कल्याणदरम्यान लोकल विलंबाने धावणार
मुंबई – मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील दिवा-कल्याण दरम्यान डाऊन धीम्या रेल्वेमार्गावर उद्या रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द केल्या असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत. हार्बर मार्गावरही उद्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन आणि अप रेल्वेमार्गांवर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांवर या काळात हार्बर रेल्वे सेवा बंद ठेवण्यात येणार आहे, असे रेल्वेने पत्रकात म्हटले आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील दिवा ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळात महत्त्वाची रेल्वे दुरुस्ती आणि देखभालीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या वेळेत या मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या असून काही गाड्या जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. हार्बर रेल्वेमार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० या काळात शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान डाऊन आणि अप धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे दरम्यानची रेल्वे सेवा सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात कुर्ला ते पनवेल विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. मेगाब्लॉकच्या काळात हार्बरच्या प्रवाशांना त्याच तिकीट आणि पासवर मुख्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवासाची मुभा दिली आहे, असे रेल्वेने म्हटले आहे.