पिंपरी-चिंचवडमधील भाजपा नगरसेविका माया बारणे यांचा राजीनामा, राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित!
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला धक्क्यावर धक्के सुरुच असून नगरसेवकांची गळती थांबत नाही. आता थेरगावचे महापालिकेत प्रतिनिधीत्व करत असलेल्या माया बारणे यांनी आज (शुक्रवारी) भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला चौथा झटका बसला आहे.
यापूर्वी भाजपचे नगरसेवक असलेल्या मोशीतील वसंत बोराटे, पिंपळेगुरवच्या चंदा लोखंडे, पिंपळेनिलखचे तुषार कामठे यांनी नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यातील बोराटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आज माया बारणे यांनी आज (शुक्रवारी) आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. भाजपच्या हुकूमशाही, भ्रष्ट कारभाराला कंटाळून नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपकडून बारणे यांनी प्रभाग क्रमांक 24 थेरगावचे महापालिकेत प्रतिनिधीत्व केले. त्यांची नगरसेवकपदाची दुसरी टर्म होती. 2012 च्या निवडणुकीत त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या. तर, 2017 च्या निवडणुकीत भाजपकडून निवडून आल्या आहेत. मागील पाच वर्षात भाजपने त्यांना एकही पद दिले नाही. त्यामुळे पक्षावर नाराज होत्या. या नाराजीतून त्यांनी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.