Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आश्वी बुद्रुक परिसरात मुलावर बिबटय़ाचा हल्ला

  • वाढत्या हल्ल्याने दहशतीचे वातावरण

राहाता |

संगमनेर तालुक्यातील मेढंवन येथील महिलेचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे बुधवारी १४ वर्षीय मुलावर हल्ला केला. दोनच दिवसांपूर्वी प्रतापपूर येथेही एका तरुणावर बिबटय़ाने प्राणघातक हल्ला करत त्याला जखमी केले. बिबटय़ाच्या या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

आश्वी बुद्रुक – निमगावजाळी परिसरात बुधवारी सकाळी प्रतीक विकास (विजय) गायकवाड (वय १४) हा जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेला होता. त्या वेळी दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने प्रतीकवर हल्ला करत डोके, कान व डोळय़ाजवळ खोलवर गंभीर जखमा केल्या. या वेळी प्रतीकने बिबटय़ाचा जोरदार प्रतिकार करत आपली सुटका करून घेत घराकडे धाव घेतली. प्रतीकचा भाऊ तेजस गायकवाड व गौरव गायकवाड यानी तात्काळ त्याला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यामुळे या जीवघेण्या हल्ल्यातून दैव बलवत्तर म्हणून प्रतीकचे प्राण वाचले आहेत. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी प्रतापपूर येथे घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत नसीर युसुफ पठाण याच्यावरही बिबटय़ाने हल्ला करीत त्यास जखमी केले. दरम्यान प्रतीक गायकवाड व नसीर पठाण यांची तब्येत आता बरी असून आश्वीसह परिसरात बिबटय़ाच्या हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने बिबटय़ाचा बंदोबस्त करून नागरिकांची दहशतीतून मुक्तता करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

  • बिबटय़ाचे हल्ले वाढले?

प्रवरा नदीतीरावरील गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात ऊस शेती, लपन क्षेत्र व मुबलक अन्न – पाणी या पोषक वातावरणात मागील अनेक वर्षांपासून बिबटय़ांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरातील कोल्हे, ससे, मोर आदि वन्य पशू- पक्ष्यांची बिबटे शिकार करत होते. परंतु आता हे वन्य पशू- पक्षी नामशेष झाले आहेत. त्यामुळे अन्नाच्या शोधात बिबटे थेट शेतकऱ्यांची पाळीव जनावरे, कोंबडय़ा, कुत्रे फस्त करत असल्याने शेतकऱ्यासह परिसरातील नागरिकांनी वस्त्या व घरांना संरक्षणासाठी कुंपणे घातली आहेत. त्यामुळे या बिबटय़ांना शिकार मिळणे कठीण झाल्याने हे बिबटे थेट मानवी वस्त्यापर्यत येऊन मनुष्यावर हल्ले करत आहेत. त्यामुळे आता वनविभागाने लोकप्रबोधन तसेच याबाबत तत्काळ ठोस उपाययोजना न केल्यास मानव आणि बिबटे यांच्यात होणारा तीव्र संघर्ष नाकरता येणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button