मुंबईत शून्य करोनाबळी; शहरातील एकही इमारत आणि जागा आता प्रतिबंधित नाही
![Zero crore in Mumbai; No building or space in the city is now restricted](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/mv-corona-2.jpg)
मुंबई | शहरात मंगळवारी एकाही करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. या वर्षांच्या सुरुवातीला २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली होती, त्यानंतर मंगळवारी पुन्हा करोनाबाधित मृत्यूची संख्या शून्यावर आली आहे, अशी माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. मंगळवारी प्रतिबंधित परिसर आणि इमारतींची संख्याही शून्यच असल्याचे पालिकेने दिलेल्या करोना आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करोनाचा पहिला रुग्ण ‘मार्च २०२०’ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा ‘शून्य’ मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सात वेळा ‘शून्य’ मृत्यूची नोंद झाली होती, तर या वर्षी २ जानेवारीनंतर आज पहिल्यांदाच पुन्हा ‘शून्य’ मृत्यूची नोंद झाली आहे. शहरात आज २३५ करोना रुग्णांची नोंद झाली. तर ४४६ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या एकूण २३०१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के असून रुग्ण दुपटीचा दरही १९३० दिवसांवर पोहोचला आहे.
महापालिकेच्या प्रयत्नांचा परिणाम
‘करोनाचा पहिला रुग्ण मुंबईत आढळून आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही केली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रतिबंधित परिसर आणि इमारतींमध्ये प्रभावी अंमलबजावणी आणि लवकरात लवकर निदान व्हावे, यासाठी ठिकठिकाणी करोना चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली. करोनाबाधित रुग्णांना वेळच्या वेळी परिणामकारक औषध उपचार मिळावे यासाठी विभागस्तरावर राबविण्यात आलेली विकेंद्रित नियंत्रण कक्षांची कार्यपद्धती, अल्पावधीत विविध ठिकाणी उभारण्यात आलेली जंबो कोविड रुग्णालये, लसीकरण सुरू झाल्यानंतर त्याबाबत करण्यात आलेली प्रभावी अंमलबजावणी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सातत्याने करण्यात आलेली जनजागृती आणि या सर्व प्रयत्नांना मुंबईकरांनी सातत्याने दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच ‘शून्य कोविड मृत्यू’ या लक्ष्याप्रती अग्रेसर होणे शक्य झाले आहे, अशी भावना अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली, मुंबईकरांनी महापालिकेच्या प्रयत्नांना दिलेल्या प्रतिसादाबद्दलही त्यांनी आभार मानले आहेत.
राज्यात २,८३१ नवे रुग्ण
मुंबई : राज्यात करोना रुग्णांचा आलेख घसरत असून दिवसभरात २,८३१ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली, तर ३५ रुग्णांचे मृत्यू झाले. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३०५४७ झाली आहे. राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे ३५१ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतची रुग्णसंख्या ४३४५ झाली आहे.