भारतीय हॉकी संघाचे पुन्हा श्रीजेशकडे नेतृत्व
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/pr-sreejesh-6.jpg)
- आशियाई क्रीडास्पर्धेसाठी संघ जाहीर
नवी दिल्ली: चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे आशियाई क्रीडास्पर्धेसाठीही भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशकडे सोपवण्यात आले आहे. नेदरलॅंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रीजेशने जबरदस्त बचाव करताना सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार पटकावला होता.
इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडास्पर्धेसाठी हॉकी इंडियाने आज आपल्या पुरुष संघाची घोषणा केली.
भारतीय संघासाठी सकारात्मक बाब म्हणजे ड्रॅगफ्लिकर रूपिंदरपाल सिंग आणि आघाडीच्या फळीत आकाशदीप सिंग यांचे पुनरागमन झाले आहे. रूपिंदरपालच्या अनुपस्थितीत गेल्या काही सामन्यांमध्ये भारताला पेनल्टी कॉर्नरवर अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला होता, त्यामुळे यंदाच्या आशियाई खेळांमध्ये भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
तत्पूर्वी, 2014 साली भारताने आशियाई क्रीडास्पर्धेत अंतिम फेरीत पाकिस्तानवर मात करुन सुवर्णपदकाची कमाई केली होती, यंदाही भारतीय संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. दरम्यान मध्यरक्षक चिंगलेसाना सिंग कांगुजामकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आशियाई क्रीडास्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघ – गोलरक्षक -आर. श्रीजेश (कर्णधार), कृष्ण बहादूर पाठक, बचावफळी – हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, वीरेंद्र लाक्रा, सुरेंद्र कुमार, रूपिंदरपाल सिंग व अमित रोहिदास, मध्यरक्षक – मनप्रीत सिंग, चिंगलेसाना सिंग कांगुजाम (उपकर्णधार), सिमरनजीत सिंग, सरदार सिंग व विवेक सागर प्रसाद, आघाडीवीर – एस. व्ही. सुनील, मनदीप सिंग, आकाशदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय व दिलप्रीत सिंग.