लंडनमधील नवाझ शरीफ यांच्या घरावर निदर्शकांचा हल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/nawaj-sharif.jpg)
लंडन – लंडनमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या अव्हेनफिल्ड अपार्टमेंट या आलिशान परिसरातल्या घरावर काल रात्री संतप्त निदर्शकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानातील न्यायालयाने कालच नवाझ शरीफ यांना ऍव्हेनफिल्डमधील मालमत्तेतील भ्रष्टाचार प्रकरणात 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर संतप्त निदर्शकांनी हा हल्ला केल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
जमावाने अपार्टमेंटचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. एका निदर्शकाने पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ शरीफ गटाच्या लंडनमधील पदाधिकाऱ्याच्या अंगावर शॉपिंग कार्ट फेकली, असेही एका वाहिनीने म्हटले आहे. या घटनेनंतर महानगर पोलिस ऍव्हेनफिल्ड घराच्या परिसरात हल्लेखोरांचा शोध घ्यायला सुरुवात केली. या निदर्शकांकडे चाकू सारखी काही शस्त्रे असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हा हल्ला पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाच्या लंडनमधील कार्यकर्त्यांनी केल्याचा संशय आहे. मात्र या पक्षाने हा आरोप फेटाळला आहे.
ऍव्हेनफिल्ड येथील मालमत्तेच्या भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानातील न्यायालयाने शरीफ यांना गेल्याच आठवड्यात 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.