पुढचे काही दिवस पुण्यातील हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहणार
पुणे | पुण्याच्या हडपसर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पुढचे काही दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे. हडपसर परिसरात असलेला मुख्य उड्डाणपूल पुढचे काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल धोकादायक झाल्याने महापालिकेकडून उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. त्यामुळे पालिकेकडून हा उड्डाणपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी शक्यतो हडपसर उड्डाणपुलाचा वापर करू नये. उड्डाणपुलाखालील रस्त्याचा वापर करावा.
काही दिवसांपूर्वीच पुणे महानगरपालिकेकडून या उड्डाणपुलाची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने काही दिवसांपुर्वीच जड वाहनांसाठी तो बंद करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारपासून या उड्डाणपुलाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता हा पुल वाहतूकीसाठी बंद केला गेला आहे. त्यामुळे हडपसर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शनिवारपासून काम सुरू करण्यात आले असून, पुढील आदेशापर्यंत पुल बंद असणार आहे.
असा असेल पर्यायी मार्ग
सातारा रस्त्याने सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर परिसरात न येता. कात्रज, कोंढवा बाह्यवळण मार्गाने मंतरवाडी चौकातून डावीकडे वळून हडपसरकडे यावे. हडपसर उड्डाणपुलाखालून सोलापूरकडे जावे. सोलापूरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर गाडीतळमार्गे डावीकडे वळावे. मंतरवाडी चौकातून कात्रजकडे जावे. मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी खडकी, विमानतळ, चंदननगर, लोणीकंद, थेऊरमार्गाने सोलापूर रस्त्याने जावे. सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाने थेऊर, लोणीकंद, चंदननगर, विमानतळ, खडकीमार्गे मुंबईकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.





