विद्यापीठात ऑनलाइन परीक्षेचा गोंधळ सुरूच
मुंबई | करोनामुळे निर्माण झालेले ऑनलाइन परीक्षांचे सत्र दीड वर्षे उलटल्यानंतरही मुंबई विद्यापीठाच्या अंगवळणी पडलेले नाही. नुकत्याच पार पडलेल्या पदव्युत्तर सत्र परीक्षांमध्ये अनेक विभागांत परीक्षेचा गोंधळ उडाला होता. विद्यापीठातील सत्र परीक्षांवर परीक्षा विभागाचे नियंत्रण नसल्याने अनेक समस्या निर्माण होत असल्याचे प्राध्यापक संघटनेचे म्हणणे आहे.
करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा विभागवार घेऊन त्याचे गुण परीक्षा विभागाकडे पाठवण्याचे आदेश विद्यापीठाने दिले; परंतु विभागांमध्ये परीक्षांचे गांभीर्य धुडकावले जात असल्याचे निदर्शनास आले. ‘परीक्षांची जबाबदारी विभागप्रमुखांची असतानाही काही ठिकाणी पीएचडी विद्यार्थ्यांवर परीक्षांचा भार टाकण्यात आला. तुम्हीच परीक्षा घ्या, गुणही द्या, अशा सूचना विभागप्रमुखांनी पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. एका विभागाने दोन तासांसाठी खुली केली जाणारी परीक्षेची लिंक तब्बल दोन ते तीन दिवस सुरूच ठेवली, तर काही विभागांमध्ये परीक्षा सुरू असताना विभागप्रमुखच हजर नव्हते,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई अॅकॅडमिक स्टाफ असोसिएशनला (उमासा) विचारले असता त्यांनीही विद्यापीठाकडे बोट दाखवले. ‘प्राध्यापकांना पुरेसे प्रशिक्षण नसल्याने परीक्षांमध्ये अडचणी निर्माण होतात. परीक्षा विभागाचे ऑनलाइन परीक्षांवर नियंत्रण राहील अशी प्रणाली हवी किंवा एखाद्या संस्थेमार्फत परीक्षांचे आयोजन करणे गरजेचे आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाला पत्रही दिले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले,’ असे ‘उमासा’चे म्हणणे आहे.





