पिंपरी चिंचवडकरांनी ठरवलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर करणार
![Pimpri Chinchwadkar has decided that NCP will be the mayor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/sanjog-waghere1.jpg)
- प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचा दावा
- भ्रष्टाचारी भाजपला घरचा रस्ता दाखविणार
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागाचे आराखडे निवडणूक आयोगाने प्रसिध्द केले आहेत. तीन सदस्यीय पध्दतीमुळे पुर्वीच्या प्रभागरचनेत राज्य निवडणूक आयोगामार्फत बदल झालेले आहेत. परंतु, त्याचा कोणताही फरक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पडणार नाही. पिंपरी चिंचवडकरांनी आता शहराचा पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच करायचं ठरवलेलं आहे. शहरातील नागरिक या निवडणुकीत भ्रष्टाचारी भाजपला घरचा रस्ता दाखविणार आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे महानगरपालिका निवडणूक यंत्रणेमार्फत आगामी निवडणुकीसाठीची प्रारुप प्रभागरचना मंगळवारी प्रसिध्द करण्यात आली. त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, “महापालिकेने एकूण ४६ प्रभागाचे आराखडे जाहीर केलेले आहेत. त्यावर हरकती व सूचना घेण्यासाठी मुदत दिलेली आहे. आयोगामार्फत तयार करण्यात आलेल्या या प्रभागरचनेत तीन सदस्यीय पध्दतीमुळे आणि नगरसेवकसंख्या वाढल्यामुळे अनेक बदल झालेले आहेत. तसे असताना देखील प्रभागरचना आणि शहरातील मतदारांचा कल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अनुकूल आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतत्वावरच शहरवासीयांचा विश्वास आहे.
भाजपच्या मंडळींनी २०१७ मध्ये खोट्या भुलथापा देऊन सत्ता मिळवली. परंतु, महानगरपालिकेतील मागील पाच वर्षाच्या सत्ताधारी भाजपचा भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार जनतेने पाहिला आहे. जनतेचे हिताचे निर्णय न घेता चुकीचे निर्णय सातत्याने भाजपने घेतले. त्यात शहरातील जनता भरडली आहे. केवळ मोठ मोठ्या प्रकल्पांचे स्वप्न दाखवून निविदा काढून टक्केवारी लाटण्याचा उद्योग या मंडळींनी केला. प्रत्यक्षात कचरा, पाणीपुरवठा, सांडपाणी, रस्ते विकासाच्या बाबती भाजपला काही करता आलेले नाही. पंतप्रधान आवास योजनेतून एकही घर उभे राहिले नाही. भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे स्मार्ट सिटी बदनाम झाली. ज्या अनधिकृत बांधकामे, शास्तीकरांचे भांडवल करून भाजपने निवडणुका लढवल्या. त्या प्रश्नावर नागरिकांना वा-यावर सोडण्याचं काम भाजपने केला. याचा हिशोब महापालिका निवडणुकीत शहरातील नागरिक घेणार आहेत. जनतेने भाजपला धडा शिकविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार आहे. शहराचा पुढचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार, हे निश्चित झाले आहे”.