१३ फेब्रुवारीपासून रणजी चषक क्रिकेट स्पर्धा सुरू; सौरव गांगुलीची माहिती
![Ranji Trophy cricket tournament starts from February 13; Information about Sourav Ganguly](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Sourav-Ganguly-.jpg)
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
रणजी चषक क्रिकेट स्पर्धा १३ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. गेल्यावर्षी कोरोनामुळे ही क्रिकेट स्पर्धा रद्द झाली होती. त्यानंतर यंदा १३ जानेवारीला सुरु होणारी रणजी चषक क्रिकेट स्पर्धा कोरोनामुळे लांबणीवर टाकली होती. मात्र आता ती फेब्रुवारीत सुरू होणार असल्याचे गांगुलीने सांगितले.
‘रणजी चषक २०२२’ ही क्रिकेट स्पर्धा कोरोनामुळे कधी सुरू होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. त्यावर माहिती देताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याने सांगितले की, ही स्पर्धा फेब्रुवारीच्या मध्यात सुरू होईल. तिच्या फॉर्मेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दोन टप्प्यांत ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सामने आयपीएल २०२२ क्रिकेट स्पर्धेपूर्वी खेळविले जातील. दुसऱ्या टप्प्यातील सामने नंतर होतील. या स्पर्धेच्या ५ ग्रुपमध्ये प्रत्येकी ६ संघ असतील. दुसऱ्या फेरीतील सामने जून-जुलैमध्ये होतील, अशी माहिती त्यांनी दिली.