शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत नागरिकांची आठ कोटी 29 लाखांची फसवणूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/cheating-crime.jpg)
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे सौदागर येथे बार्शीच्या विशाल फटे पॅटर्नची काहीशी पुनरावृत्ती झाल्याचे उघडकीस आले आहे. चार जणांनी मिळून नागरिकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला फायदा होणार असल्याचे आमिष दाखवले. त्याबाबत बनावट इलेक्ट्रिक अभिलेख तयार केला. यामध्ये नागरिकांची तब्बल आठ कोटी 29 लाख 75 हजार 803 रुपयांची फसवणूक केली.
इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीच्या शेअर ट्रेडिंग कंपनीचे डायरेक्टर जय मावजी, निजय मेहता, निकुंश शहा, निलेश शांताराम वाणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेश मुरलीधर शिंदे (वय 44, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार 1 सप्टेंबर 2021 ते 27 जानेवारी 2022 या कालावधीत रेनबा प्लाझा, पिंपळे सौदागर येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीच्या शेअर ट्रेडिंग ब्रोकर कंपनीत गुंतवणूक केली. गुंतवणूक केलेल्या रकमेवर प्रत्येक महिन्याला फायदा करून देण्याचे आरोपींनी आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी यांना दरमहा कोणतीही रक्कम दिली नाही. फिर्यादी यांनी गुंतवलेली रक्कम परत न देता कंपनीच्या मेटा ट्रेडर फोर या अॅपवर बनावट व खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला. त्यातून फिर्यादी आणि अन्य लोकांची एकूण आठ कोटी 29 लाख 75 हजार 803 रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने सोमवारी (दि. 24) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ तपास करीत आहेत.