गुजरातहून पुण्यात येणारा तब्बल 11 लाखांचा गुटखा जप्त, आळेफाटा पोलिसांची धाडसी कारवाई
![Gutka worth Rs 11 lakh seized from Gujarat to Pune, daring action by Alleppey police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/guthkha.jpg)
जुन्नर | प्रतिनिधी
महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या गुजरातमधून येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे-नाशिक महामार्गावर सापळा रचून गुटख्याने भरलेली कार पकडण्यात आली आहे. आळेफाटा पोलिसांनी मोठी जोखीम पत्करुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कारला पकडलं आहे. या कारवाईत तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (23 जानेवारी) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आळेफाटा पोलिसांनी केली आहे.
आळेफाटा पोलिसांनी या कारवाईत एक रेनॉल्ड कारसह शैलेश शशिकांत बनकर (वय 36 रा. रानमळा, कडूस ता. खेड) आणि सचिन सखाराम सांडभोर (वय 30, रा. दोंदे ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस कर्मचारी पद्मसिंह अप्पाराव शिंदे पोलीस वाहनातून रविवारी पहाटे पुणे-नाशिक महामार्गावर गस्त घालत होते. आळेखिंड येथून आळेफाट्याच्या दिशेने येत असताना पोलीस गाडी पाहून रेनॉल्ड कार नंबर MH 12 TS 1943 चालकाने सुसाट पुढे पळविली. या कारचा जेव्हा पाठलाग करण्यात आला तेव्हा कार चालकाने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर अत्यंत धाडसाने कारला अडविण्यात आलं.
याबाबत जेव्हा चौकशी केली असता गाडीमधील चालकाने आम्ही घाईत असून आम्हाला जाऊद्या अशी विनंती केली. मात्र, पोलिसांनी काहीही ऐकून न घेता कारची तपासणी केली. त्यावेळी कारमध्ये खोके आणि काही मोठे पोते आढळून आले. त्यानंतर कार आळेफाटा पोलीस ठाण्यात आणून अधिकची चौकशी करण्यात. तेव्हा या कारमध्ये विमल गुटखा सापडला.
पोलिसांनी हा गुटखा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या गुजरातमधून आयात करून पुणे जिल्ह्यातील दुकानदारांना पुरवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ताब्यात घेतलेला आरोपींकडून अधिक चौकशीत याचा उलगडा होणार असल्याने जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत.