राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू कराव्यात; शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
![Schools in the state should start from Monday; Education department's proposal to the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/School-1-1.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्यात याव्यात असं या प्रस्तावात म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि त्यापासून लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून त्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी विविध घटकांतून केली गेली.
कोरोना नियमांचं पालन करुन राज्यातील शाळा सुरू कराव्यात. त्या संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे असं राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्यातील विविध समाजघटकांतून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी सातत्याने मागणी होत होती. त्यावर विचार करुन तशा प्रकारचा प्रस्ताव आता शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की “आताची परिस्थिती लक्षात घेऊन आणि भविष्यातील धोक्यांचाही विचार करुन एसओपी नियमांची आखणी केली असून त्यात वेळेनुसार आणखी अपडेट्स करण्यात येतील. शेवटी मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता महत्त्वाची आहे. म्हणून त्या संबंधिचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.”
यासंबंधीचा निर्णय लवकरच मुख्यमंत्री घेतील अशी अपेक्षा मंत्री वर्षा गायकडवाड यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे.दरम्यान, या विषयावर मंगळवारी राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सची एक बैठक झाली असून टास्क फोर्सचे सदस्यही राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत.