दोन लाख हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान; अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल
![Loss of agricultural produce over two lakh hectares; Farmers worried due to untimely rains](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/garpit-1.jpg)
मुंबई |
राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला असून, कापूस, संत्रा, केळी, पपई, ज्वारी, मका, हरबरा आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आह़े नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
राज्यात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून गारपीट आणि पाऊस पडत आहे. त्याचा फटका धुळे जिल्ह्यातील सिंदखेड, शिरपूर या तालुक्यांना बसला असून जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अकोला जिल्ह्यातील अकोला, अमरावती जिल्ह्यातील भातकुळी, तिवसा, मोर्शी, चांदुरबाजार या तालुक्यांतील शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अशाच प्रकारे वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा तर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, आमगाव, सडक अर्जुनी या तालुक्यात गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे.
तीन दिवसांत अवकाळी पावसामुळे सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, गहू, हरभरा, कापूस, ज्वारी, केळी, पपई, तूर, कांदा, करडई, मोहरी ही पिके आणि भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अशाच प्रकारे २८ आणि २९ डिसेंबरला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जालना, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील ६० हजार हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून हातातोंडाशी आलेली जिरायत आणि बागायती पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ातही अवकाळी पावसामुळे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर जिल्ह्यांतील एक लाख ४० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. अजूनही नागपूसह काही भागांत पाऊस सुरू असून नुकसान झालेल्या सर्वच ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यावर नेमके किती नुकसान झाले आहे, याची माहिती मिळेल आणि त्यानुसार मदत दिली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
- विदर्भात लिंबाएवढय़ा गारांचा मारा
नागपूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपल़े नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांत लिंबाएवढय़ा गारा पडल्याने भाजीपाला आणि फळांसह रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.