पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या जोर-बैठका; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
- पिंपरी चिंचवडचा महापालिकेचा गड सर करण्याची तयारी
- शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील यांचे पक्षकार्यालयात ठिय्या
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१७ मध्ये हातातून गेलेला ‘गड’२०२२ मध्ये पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी पक्ष कार्यालयात ठिय्या मारला आहे. विविध सेलचे पदाधिकारी- कार्यकर्ते यांच्यापासून आजी-माजी नगरसेवकांच्या जोर-बैठका सुरू आहेत. विशेष म्हणजे, प्रभागनिहाय मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीप्रेमी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक कोणत्याही क्षणाला लागू होऊ शकते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेषतः महापालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने जोर- बैठकांना सुरुवात केली आहे. यासाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला गेला आहे. तब्बल पंधरा वर्षे या शहरांमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यश मिळवले मात्र महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत सत्तांतर झाले. राष्ट्रवादीतील काही नेते आणि अनेक आजी-माजी नगरसेवक फुटून भाजपामध्ये सामिल झाले आणि अजित पवार यांना अत्यंत दारूण पराभव केला. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या जोडगोळीने हा चमत्कार घडवून आणला. आज या दोघांचीही शहराच्या राजकारणावरची पकड कायम असल्याने भाजपा निश्चिंत आहे. मात्र, अजित पवार यांनी राज्याची सूत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड ची गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्युहरचना आखली जात आहे. त्यासाठी अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांनीही लक्ष केंद्रित केले आहे .यासाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची अत्यंत चांगली साथ मिळत असल्याचे चित्र आहे.
- …कशी असेल रणनीती ?
पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला गेल्यावेळी एकूण ८ लाख ८९ हजार ३४५ मते मिळाली आणि ३६ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५७ आणि शिवेसनेचे २४ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते, तिथे विशेष लक्ष केंद्रीत करायचे अशीही राष्ट्रवादीची व्युहरचना आहे. यासाठी आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, विविध सेल अध्यक्ष अशा सर्वांच्या उपस्थितीत बैठका सुरू आहेत.