पिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र
‘मी अहमदाबाद सिपी विजयसिंग बोलतोय, पैसे पाठव’ म्हणत थेट पोलीस निरीक्षकाला मागितले पैसे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/maharashtra-police.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
‘मी अहमदाबाद सिपी विजयसिंग बोलतोय, कृष्ण प्रकाश माझे मित्र आहेत. माझ्या मोबाईल क्रमांकावर पेटीएम, गुगल पे कर, असे म्हणत एकाने थेट पोलीस निरीक्षकालाच पैसे मागितले. पोलीस निरीक्षकाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 8 ते 28 डिसेंबर रोजी चिंचवड येथे घडला आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार, खान (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना फोन केला. ‘मी अहमदाबाद सिपी विजयसिंग बोलतोय, माझ्या मोबाईल क्रमांकावर पेटीएम, गुगल पे कर’, असे म्हणत पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच, पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे आपले मित्र असल्याची बतावणी देखील आरोपीने केली.
फिर्यादी आणि अन्य पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर पेटीएम, गुगलपेद्वारे आत्तापर्यंत 24 हजार रुपये पाठवले आहेत. मात्र, त्याच्या बोलण्यावरून संशय आल्याने फिर्यादी चव्हाण यांनी पैसे देण्यास नकार देऊन चिंचवड ठाण्यात गुन्हा नोंदवला. आरोपीने काहीजणांना आपण पोलिसांचा बातमीदार आहे, असे सांगूनही अनेक पोलिसांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.