पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिलासाठी चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
![Pimpri Chinchwad Municipal Corporation inaugurates training camp for women to drive a four wheeler](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/IMG_9119-1.jpg)
पिंपरी-चिंचवड | महापालिकेच्या वतीने शहरातील महिला वर्गास प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजने अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चार चाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण व पक्के ड्रायव्हिंग लायसन्स देणेबाबत शिबिराचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिकेच्या प्रांगणात या शिबिराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता खुळे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसदस्या योगिता नागरगोजे, स्वाती काटे, आरती चोंधे, निर्मला कुटे, उप आयुक्त अजय चारठाणकर, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, समृद्धी मोटर ड्रायव्हिंग स्कुलच्या राणी आदियाल व महिला प्रशिक्षाणार्थी उपस्थित होत्या.
या योजनेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील २५ ते ४५ वयोगटातील महिला अर्ज करु शकतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. या योजनेकरीता आजपर्य़ंत साधारणत: दिड हजार महिलांनी अर्ज केले असून या योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे. तरी या योजनेसाठी जास्तीत जास्त शहरातील महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.