म्हाडा पेपरफुटी प्रकरण : राज्य परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकारी पुणे पोलिसांच्या ताब्यात, सकाळपासून चौकशी सुरू
![MHADA Paperfooty case: Senior officers of State Examination Department in the custody of Pune Police, investigation started from this morning](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/class-10-leaked-leakedpapers_647_021817044651.jpg)
पुणे | म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळपासून ही चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यालाच पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा डॉ. प्रितेश दिलीपराव देशमुख (वय 32) याच्यासह अंकुश रामभाऊ हरकळ (वय 44), आणि संतोष लक्ष्मण हरकळ (वय 42) यांना अटक केली आहे. म्हाडाचा पेपर फुटीप्रकरणात या तिघांची चौकशी सुरू असताना मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पुुणे पोलिसांनी आज पहाटे सुपे यांना पिंपरी-चिंचवड परिसरातील राहत्या घरातून ताब्यात घेतले.