आरोग्य-सफाई कामगारांचा कृतज्ञता पुरस्काराने होणार सन्मान !
– उदय गायकवाड युवा मंच, अमर मित्र मंडळाचा उपक्रम
– आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक पुढाकार
पिंपरी । प्रतिनिधी
भोसरीचे आमदार तसेच भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी झटणाऱ्या व ग्राउंड लेव्हलला कार्यरत असणाऱ्या शासकीय कामगारांचा ‘कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. अमर मित्र मंडळ, नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशन, नवजीवन शिक्षण संस्था व उदय गायकवाड युवा मंचच्या वतीने रविवारी (दि.२८) सायंकाळी सहाच्या सुमारास दिघी येथील राघव मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवसासाठी अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी आणि विधायक कामे तसेच कार्यक्रम करावेत अशा सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या आहेत. त्यांच्या मागर्दर्शनानुसार तसेच सामाजिक बांधिलकी जपत दिघी परिसर स्वछता सुंदर ठेवणारे स्वछता कर्मचारी व वायसीएम रुणालयात रुग्णसेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ‘कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मान करणार असल्याचे उदय गायकवाड यांनी सांगितले. तसेच, यावेळी महेश लांडगे यांचा अभिष्टचिंतन सोहळाही आयोजित केला आहे.