कासारवाडी मेट्रो स्थानकावर शालेय विद्यार्थ्यांनी दिली भेट
![Visit by school children at Kasarwadi metro station](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-9-1.jpg)
पिंपरी चिंचवड | संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन नंतर पुणे मेट्रोचे पूर्णत्वास आलेले कासारवाडी हे मेट्रो स्थानक आहे. कासारवाडी मेट्रो स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मेट्रो सुरु होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी मेट्रो स्टेशनवर भेट देऊन प्रत्यक्ष मेट्रो प्रवासाची मजा लुटली.माझी स्मार्ट मेट्रो या उपक्रमाअंतर्गत शनिवारी (दि. 20) कासारवाडी मेट्रो स्टेशनवर 200 पेक्षा अधिक शालेय विद्यार्थी व 150 नागरिकांनी मेट्रो स्टेशन पाहण्याचा तसेच प्रत्यक्ष मेट्रोतून प्रवासाचा अनुभव घेतला. पुणे मेट्रो व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या सौजन्याने आयोजित या कार्यक्रमामध्ये फुगेवाडी येथील महापालिकेची शाळा, रहाटणी येथील एसएनबीपी शाळा, रावेत येथील मस्ती की पाठशाळा, चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मधील विद्यार्थी सहभागी झाले.पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपवर नोंदणी करणाऱ्या 150 नागरीकांना देखील मेट्रो भेटीची संधी देण्यात आली. पुढील उपक्रमासाठी अॅपवर नोंदणी लवकरच सुरू केली जाणार आहे. या उपक्रमात मुख्यत्वे वंचित घटकातील मुले; ज्यांना आपल्या शहरातील संस्था शिक्षण देत आहेत ते सहभागी झाले होते. मेट्रो सेवा प्रत्यक्ष सूरू होण्यापूर्वी आम्हाला ती अनुभवायची संधी मिळत आहे याचे मुलांना अप्रूप वाटले.
अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यावरून मेट्रो ही आपली आहे आणि समाजातील सर्व घटकांसाठी आहे हा महत्वाचा विचार त्यांच्यात रुजला गेला. सामजिक समरसतेचे हे उत्तम उदाहरण. पीसीएमसी स्मार्ट सारथी हे शहराचे अधिकृत अॅप या मुलांना माहित होते व त्याविषयी त्यांनी माहिती देखील दिली.