अनाम प्रेम परिवाराने अग्निशमन दलाच्या जवानांसोबत साजरी केली गुरू नानक जयंती
पिंपरी चिंचवड | अनाम प्रेम परिवाराने गुरुनानक जयंती पिंपरी – चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांसोबत साजरी केली. जवानांच्या कामाबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, अधिकारी ऋषिकांत चिपाडे, प्रताप चव्हाण, सुमारे 70 पुरुष व विशेषतः महिला या कार्यक्रमात उपस्थित होते तसेच अनाम प्रेम परिवाराचे योगेश भंडारे, शुद्धोदन भंडारे, वैभव मोरे, उदय नगरकर, मानसी नगरकर उपस्थित होते.गुरुनानक जयंती आणि अग्निशमन दलाच्या जवानांचा संबंध आहे. राजा जनक यांचा एक पाय कायम ज्वालाग्नीमध्ये रोवलेला असायचा असे म्हटले जाते. त्याच प्रमाणे अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांचे देखील दोन्ही पाय अग्निज्वालांच्या विळख्यात कायम असतात. समाज सुरक्षेच्या ध्येयासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या या वीर योद्धयांचा गुरु नानक जयंतीच्या दिवशी सन्मान करण्यात आला.अनाम प्रेम परिवार या संस्थेने अग्निशमन दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अग्निशमन दलाचे जवान व अधिकारी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची चिंता न करता स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवतात या त्यांच्या त्यागाला आम्ही वंदन करतो असे अनाम प्रेम परिवार यांच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, ऋषिकांत चिपाडे साहेबांनी त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या धाडसी कार्याची सर्वांना माहिती दिली. बाळासाहेब वैद्य या जवानाने त्यांचा एक अविस्मरणीय अनुभव सांगितला. किरण गावडे यांनी अग्निशमन दलाची समाजाप्रती असलेली जबाबदारी कोणत्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे पार पडली पाहिजे, असा संदेश दिला.
अनाम प्रेम परिवाराचे अनिल मोरे यांनी या संपूर्ण प्रस्ताविक केले.